सोमवार, २० सप्टेंबर, २०१०

Think About it ........

जॉर्ज फर्नांडिस यांनी संरक्षणमंत्री असताना , १९९८ साली , भारताला खरा धोका चीनपासून आहे असे विधान केले होते. अर्थातच अनेकांनी फर्नांडिस यांचा निषेध केला. डावे पक्ष यात आघाडीवर होते. तेव्हाचे त्यांचे विधान जितके खरे होते त्यापेक्षा त्याची तीव्रता आज अधिक वाढली आहे. आता भारताचे संरक्षण दलाचे अधिकारी मान्य करतात की चीनने भारताभोवती कडे केले आहे. नेपाळमध्ये चीनने पाय रोवले आहेत. तेथे डाव्या पक्षांचे सरकार आहे. पलिकडे असलेल्या म्यानमारमध्ये म्हणजे पूर्वीच्या ब्रह्मदेशातील राज्यकर्ते चीनच्या ओंजळीने पाणी पितात. तिबेटवर चीनचा ताबा आहे. आता चीनने पाकिस्तानमध्ये शिरकाव केला आणि बांगलादेशातही तेचे केले आहे. खाली श्रीलंकेतील महत्त्वाची कामे चीनने हाती घेतली आहेत. कोलंबो बंदराची नव्याने उभारणी चीन करत आहे. चीन सतत अरुणाचल प्रदेश या राज्यावर आपला हक्क सांगत असते. आज अशी स्थिती आहे की चीन हे राज्य सहजतेने ताब्यात घेऊ शकते. तसे झाले तर इशान्य भारतावर चीन नियंत्रण राखू शकेल. दुदैर्वाने भारतीय राज्यकर्ते , आजही पाकिस्तान हा भारताचा मोठा शत्रू आहे असे समजून चालले आहे. चीनच्या दृष्टिने भारताला असे वाटणे सोयीचे आहे. कारण भारताची सारी शक्ती पाकिस्तानला तोंड देण्यात खर्ची होते आहे. पाकिस्तान भारतात सतत दहशतवादी कारवाया करत आहे , काश्मीरमध्ये तेथील लोकांना भडकवत हिंसाचार करत आहे यामागेही चीनची फुस असण्याची असण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कर एकदा का पाक सीमेवर गुंतून पडले की कदाचित बांगलादेश त्यांच्या सीमेवर गडबड सुरू करुन भारतीय सैन्याला अडकवेल. याचा फायदा चीन घेण्याची शक्यता अधिक आहे. चीनला कोणत्याही परिस्थितीत आशिया खंडात भारताला वर्चस्व स्थापू द्याचे नाही आहे. भारतीय उपखंडातही भारताने बिग ब्रदरची भूमिका बजावू नये अशी चीनची खेळी आहे. भारत सध्या अमेरिकेच्या गोटात जरा जास्तच गेला आहे. यामुळे चीनशी आपले संबंध ताणले गेले आहेत. भारताला शह देऊन चीन , एकप्रकारे अमेरिकेलाही सिग्नल देईल की आमच्या वाट्याला हिंमत असेल तर या. १९५०च्या दशकात पंडित नेहरूंनी तेव्हाच्या सोव्हिएत युनियनशी जरा जास्तच मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले होते. चीनने १९६२च्या लढाईत दाखवून दिले की भारताच्या मदतीला सोव्हिएत युनियन येऊ शकत नाही. आता चीन हेच अमेरिकेबाबत करेल. सध्या दोनच महासत्ता आहेत. अमेरिका आणि चीन. भारत महासत्ता बनू शकेल असे म्हणतात. भारताला तडाखा दिला की चीनचे जागतिक राजकारणावरील आणि अर्थकारणावरील वर्चस्व सिद्ध होईल. चीन याच दिशेने पावले टाकत आहे. पन्नास वर्षांपूर्वी हिंदी चीनी भाई भाईच्या घोषण दिल्या गेल्या. त्या चीनने हल्ला करून हवेत विरवल्या. चीनचे कृत्य इतके अनपेक्षित होते की , भारतीय सैन्याला हालचाल करण्यास वेळच मिळाला नाही. तेव्हा नेहरूंनी कणखरपणा दाखवला असता , लष्कराची सूत्रे योग्य नेत्यांच्या हाती दिली असती तर आपण चीनला धडा शिकवू शकलो असतो. आता चीनचे लष्करी सार्मथ्य इतके आहे की भारताला चीन जड जईल आणि पाक आणि बांगला देश जर चीनला सामील झाले तर भारताची अवस्था बिकट होईल. या मामल्यात अमेरिकेला भारताच्या बाजूने उभे रहावे लागेल. पण तसे होणेही धोक्याचे आहे , कारण महाशक्तींच्या लढाईत आपण तुडवले जाऊ. आपले सर्वभौमत्वही यात गमावले जाऊ शकते. युद्ध नेहमी दुस-याच्या भूमीवर खेळावे या नियमाला अनुसरून , चीन आणि अमेरिका , भारतीय उपखंडावर स्वामीत्व मिळवण्याचा प्रयत्न करतील. पाकिस्तानमध्ये अमेरिकेने काही प्रमाणात पाय रोवले आहेत. आता चीनला पाकिस्तानने , पाकव्याप्त काश्मीरमध्ये बोलावले आहे. पाक नौदलात चीनच्या दोन युद्धनौका सामील होणार आहेत. चीनने पाकिस्तानला मदत करू नये अशी भारतीय नेत्यांची इच्छा आहे. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमचे कोणी शत्रू किंवा मित्र नसतात , असतो तो निखळ स्वार्थ. भारताने चीनचे नाक दाबले की चीनचे वर्तन सुधारेल. आज चीनचे किमान दोन हजार इंजिनियर्स बंगळूरू आणि हैदराबाद येथील प्रमुख आयटी कंपन्यांत काम करत आहेत. नारायण मूर्ती , अझिझ प्रेमजी अशांना , हे चीनी नेमके काय करतात याची कल्पना असणे शक्य नाही , पण त्यांना ठेवणे देशासाठी धोक्याचे ठरू शकते याची कल्पना असू शकते. त्यांना कल्पना नसेल तर भारत सरकार या कंपन्यांना धोक्याची जाणीव करून देऊ शकते. चीनला भारताने शक्ती दाखवायची असेल तर पाकिस्नाला धडा शिकवायला हवा. सध्या भारत हा बलवान देश असला तरी पाकिस्तान सीमेवर आणि भारतात काहीही गोंधळ ठडवत असते. पाकिस्तान कोसळले तर तेथे अतिरेकी गट फोफावतील अशी भीती भारताला सतत घातली जाते , पण सध्याही अतिरेक्यांचेच वर्चस्व पाकिस्तानमध्ये आहे , अगदी पाक लष्करातही अतिरेकी आहेत. अतिरेक्यांच्या हाती पाक अण्वस्त्रे आली तर जगाला ते हानीकारक ठरेल असेही बोलले जाते. पण भारताने कडक पाऊल उचलले नाही तरीही हे होऊ शकते हे आपण विसरतो. खरे म्हणजे भारतीय नेतृत्व कचखाऊ आहे. भारतीय विमान कंदाहार पळवून नेले तेव्हा आपण अतिरेक्यांना सोडून दिले. संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हाही आपण तीव्र प्रतिक्रिया देऊ शकलो नाही आणि मुंबईत कसाब आणि इतर नऊ अतिरेकी घुसले आणि देेशाशी युद्ध पुकारले तेव्हाही आपण ठोशास ठोसा देऊ शकलो नाही. कारण पाकिस्तानला अमेरिकेचा आशीर्वाद आहे आणि पाकिस्तनामध्ये अमेरिकेचे हितसंबंध गुंतलेले आहे. भारताने पाकिस्तनाचा खात्मा केला तर भारताचे जागतिक पातळीवर वजन वाढेल आणि अमेरिकेला नेमके तेच नको आहे. पाकिस्तानवर ताबा ठेवून अमेरिका , एका बाजूला चीन , दुसरीकडे भारत यांना शह द्यायला बघते आहे.शिवाय अफगाणिस्तान , इराणवरही लक्ष द्यायला पाक हे योग्य ठिकाण आहे. अशा परिस्थितीत , महासत्ता होण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे हे कृतीने दाखवून द्यावे लागेल. त्यासाठी चीनला तितक्याच स्पष्ट शब्दांत हे सांगावे लागेल. भारतीय नेते हे करतील का हा कळीचा मामला आहे.